संवेदनशील मनाने घेतलेला प्रतिसाद म्हणजे या सर्व कलांचा मनावर झालेला प्रभाव व्यक्त करत जाणे. मला असे क्षेत्र मिळाले की, माझ्या कला भावनांना वाट करत जाता आले, हे माझे भाग्य. अनेक कामातून या विचारातून प्रवास करीत जाताना अशा जागा मिळाल्या तिथे मला व्यक्त होता आले. सर्व भावनांना एकाच वेळी व्यक्त होता येत नाही. त्याला सुद्धा संयम ठेवावा लागतो. योग्य तिथे योग्य प्रमाणात कमीत कमी आशयात व्यक्त होताना आपला आवेश सजग करावा लागतो. ती भाषासुद्धा वेगळी असते. प्रत्येक माध्यमा प्रमाणे भाषेचा बदल करावा लागतो. कधी कधी प्रमाणातून, आकारातून व्यक्त व्हावं लागतं. त्याचे आकारमान व अवकाश कमी जास्त करून त्यातून प्रकट होणारा छाया-प्रकाशाचा खेळ दक्षतेने अनुभवावा लागतो. प्रकाशाची छाया व प्रखरता यांचा मेळ घालून अवकाशाची निर्मिती जाणीवपूर्वक करावी लागते.त्यासाठी संवेदनशील होता आलं पाहिजे. जे आपण करतो त्यात सर्व कलेचा व अनुभवाचा अर्क तर आला पाहिजे. पण या सर्वाचा सर्वांगीण वापर करताना एकाग्र होऊन काम करत राहिलं पाहिजे. जे तुमच्यात मुरलं आहे ते प्रकट होताना कोणताही आविभाव आणता, चांगलं का वाईट याचा विचार न करता निर्विकारपणे निर्मिती केली पाहिजे. त्या निर्मितीची चिकित्सा नंतर करता येईल. पण अशी प्रक्रिया निसर्गत: घडली पाहिजे म्हणजेच घडत जाणे हे नैसर्गिक पाहिजे त्यात अवधान नको. शून्य मनाने निर्माण झालेली कलाकृती ही नैसर्गिक निर्मिती म्हणता येईल. आकाराच्या भोवऱ्यात आशय व विषय बुडून जाऊ नयेत म्हणून आकारात न अडकता, विषय व आशयातूनच आकार निर्मिती झाली पाहिजे. विषयाचे भान ठेवत निर्मिती झाली पाहिजे. कारण, मूळ कारण तेच आहे.
“Form follow function” हे कालातील सत्य आहे पण यात सुद्धा निसर्गभान जपले पाहिजे. विषय जरी महत्त्वाचा असला तरी त्यातून होणारी निर्मिती ही रुक्ष होता कामा नये. आजूबाजूचे भान व ठेवण सांभाळत त्यावेळच्या क्षणात, विचारातील प्रेरणेतून अवतरलेली विकासदृष्टी हे निर्मितीचे अंग असले पाहिजे. त्यातून विविधता येत राहील व त्या क्षणाची ती निर्मिती होईल. हा क्षण जपण्याचे काम तुमच्या शून्य मनाच्या अवस्थेत असेल. हीच अवस्था निसर्गाकडे घेऊन जाईल व अनेक प्रभावातून सुटका होऊन त्या क्षणांची प्रेरणा जपत जाईल.